पुणे : एल्गार परिषद तपासाचा वाद आता कोर्टात गेला आहे. पोलिसांनी तपासाची सूत्र देण्यास नकार दिल्यामुळे एनआयएने पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. एल्गारचा तपास राज्याने एनआयएकडे वर्ग करण्यासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. या तपासावरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार संघर्ष उभा राहण्याची चिन्ह आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NIAचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिस आयुक्तालयात आले होते. मात्र राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून आदेश आल्याशिवाय खटल्याशी संबंधित कागदपत्र हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी नकार दिला. हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे देण्यास राज्य सरकार उत्सुक नाही. त्या दृष्टिकोनातून कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. असं असताना NIAच्या वतीने पुणे सत्र न्यायालयात तपास वर्ग करण्याची विनंती करणारा अर्ज सादर करण्यात आला आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. पुणे पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.


दरम्यान, कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साक्ष देण्यासाठी पाचारण केलं आहे. याप्रकरणी फडणवीसांनी साक्ष घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय लाखे पाटील यांनी केली होती. त्यानुसार चौकशी आयोग फडणवीस यांना साक्षीसाठी बोलवणार आहे. फडणवीस यांनी न्याय होण्यासाठी सहकार्य करावं, असं मत आयोगानं व्यक्त केलं आहे.