Shridhar Patankar ED Raid | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या प्रॉपर्टीवर ईडीची कारवाई
रश्मी ठाकरे यांचे बंधु आणि मुख्यमंत्र्याच्या मेहुण्याच्या प्रॉपर्टीवर टाच
ठाणे : आताची सर्वात मोठी बातमी आहे. ईडीने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनाच आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या प्रॉपर्टीवर ईडीने (ED) कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridahar Patankar) यांच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिका ईडीकडून सील करण्यात आल्या आहेत. एकूण 6.45 कोटींच्या मालमत्तेवर ईडीकडून टाच आणण्यात आली आहे. पुष्पक बुलियन फसवणूक प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.
श्रीधर पाटणकर यांचे बँकेचे अकाऊंट आणि काही महत्त्वाची कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली आहेत.
नेमक प्रकरण काय आहे?
2017 मध्ये 20 ते 30 कोटी रुपये पुष्पक बुलियन कंपनीने नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीला हवालाच्या माध्यमातून वळते केले होते. हवाला रॅकेट चालवणाऱ्या नंदकिशोर तिवारी या व्यक्तीने दोन तीन शेल कंपन्या उभ्या करुन ते पैसे दुसऱ्या कंपन्यांना दिले. त्यानंतर ते पैसे श्रीधर पाटणकर यांच्यापर्यंत पोहचवण्यात आले असा आरोप आहे.
याच प्रकरणासंदर्भात ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर कारवाई केली आहे.
किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
एकही घोटाळेबाजांना सोडणार नाही, मग ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो की त्यांचा मेहुणा असो, त्यांचा डावा हात असो की उजवा हात असो, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
या घोटाळेबाजांविरोधात मी गेली दीड वर्ष लढतोय, आता अॅक्शन सुरु झाली आहे, उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेने ज्या पद्धतीने माफियागिरी सुरु केलेली आहे, तो सर्व पैसा वसूल केला जाणार, लूटीचा पैसा जनतेच्या तिजोरीत जमा करावाच लागेल असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
पाटणकर यांनी दोन डझन शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले आहेत, श्रीधर पाटणकरच्या अकाऊंटमधून कुठे कुठे पैसे पोहचवले गेले आहेत हे जेव्हा बाहेर येईल तेव्हा उद्धव ठाकरे यांना उत्तर देता येणार नाही.
हा सर्व पैसा महापालिकेचे कंत्राटदार आणि ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांकडून आलेला आहे, सर्व हिशोर जनतेसमोर ठेवणार असा आवाहनही किरीट सोमय्या यांनी केला आहे.