मुंबई : निसर्गानं महाराष्ट्रावर मुक्तहस्तानं उधळण केली आहे. राज्यातील काही एक ना अनेक ठिकाणं याचीच प्रचिती देत असतात. सध्याच्या घडीला साताऱ्यातील कास पठाकारडे पाहतानाही अशीच प्रतिची येत आहे. असंख्य पर्यटक आणि निसर्ग प्रेमींसाठी परवणी असणाऱ्या कास पठारावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्मिळ आणि तितक्याच लक्षवेधी फुलांचा बहर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी सप्टेंबरच्या १ तारखेपासून हे पठार पर्यटकांसाठी खुलं केलं जातं. पण, यंदा मात्र हे चित्र काहीसं वेगळं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक पर्यटनस्थळं बंद असल्यामुळं कास पठाराची परिस्थितीही काही वेगळी नाही. यंदा कास बहरलंय खरं, पण निसर्गाची ही लीला पाहण्यासाठी पर्यटकांना मात्र या ठिकाणाला भेट देता येणार नाही आहे. 


जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद असणाऱ्या या कास पठारावर देशाच्या कानाकोपऱ्यातून अभ्यासक आणि पर्यटक भेट देत असतात. पण, यंदा मात्र हे पठार कुलूपबंदच असेल. 


 


एकिकडे कास पठारावर दुर्मिळ फुलांचा बहर सुरु झालेला असतानाच दुसरीकडे पर्यटकांना मात्र येथे प्रवेशबंदी आहे. येथील कुंपणं पूर्णपणे बंद करण्यात आली असून, या भागाला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. परिणामी येथे कोणाचाही वावर दिसून येत नाही. अतिशय सुरेख अशा कास पठारावर अनेक लहानमोठे धबधबे आणि तलाव आहेत. ज्या भागांमध्ये दुर्मिळ फुलांची दाटी पाहायला मिळत आहे. पण, या वर्षी मात्र हा बहर सर्वांनाच दूरूनच पाहावा लागणार आहे. त्यामुळं पर्यटकांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे.