अर्न्सट अँण्ड यंग (ईवाय) कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी अतिताणामुळे मृत्यू झालेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी कंपनीतील कोणीही उपस्थित न राहिल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. आमच्या संस्कृतीत ही फार दुर्लक्षित बाब असल्याचं ते म्हणाले आहेत. 26 वर्षीय अॅना सॅबेस्टियनचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. अॅना सॅबेस्टियन कंपनीत चार महिन्यांपूर्वीच सीए म्हणून कामाला लागली होती. कंपनीत रुजू झाल्यानंतर चार महिन्यातच तिचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणीच्या मृत्यूनंतर राजीव मेमानी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राजीव मेमानी यांनी LinkedIn वर पोस्ट शेअर केली असून अॅना सॅबेस्टियनच्या मृत्यूमुळे आपण फार दु:खी असल्याचं म्हटलं आहे. 


"मी त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून शोक व्यक्त केला आहे. मला कल्पना आहे की, कोणतीही गोष्ट त्यांच्या जीवनातील पोकळी भरून काढू शकत नाही. तिच्या अंत्यसंस्काराला आम्ही उपस्थित राहू शकलो नाही याबद्दल मला मनापासून खेद वाटतो. हे आपल्या संस्कृतीसाठी पूर्णपणे परके आहे. असे यापूर्वी कधीही घडले नाही; पुन्हा कधीही होणार नाही,” असं राजीव मेमानी म्हणाले आहेत.


राजीव मेमानी यांनी यावेळी आपण कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात मैत्रीपूर्ण, चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत आराम करणार नाही असंही म्हटलं आहे. "आमच्यासाठी कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम, निरोगी जागा निर्माण करणं नेहमीच प्राधान्य राहिलं आहे. आमच्या कर्मचाऱ्यांच्या हिताला आम्ही नेहमीच प्राधान्य देतो. मी हे सांगू इच्छितो की आमच्या लोकांचे कल्याण हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि मी वैयक्तिकरित्या हे उद्दिष्ट पूर्ण करेन,” असं ते म्हणाले आहेत.


अॅना सॅबेस्टियन मार्च महिन्यात कंपनीत रुजू झाली होती. 20 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. तिची आई अनिता यांनी कंपनीला जाहीर पत्र लिहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कामाच्या अतिताणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. तसंच त्यांनी दावा केला की कंपनीतील कोणीही तिच्या मुलीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते. "तिच्या अंत्यसंस्कारानंतर, मी तिच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला, परंतु मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. मूल्ये आणि मानवी हक्कांची भाषा करणारी कंपनी त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यातील एका कर्मचाऱ्याच्या अंतिम क्षणी गैरहजर कसे राहू शकतात?", असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे. 


दरम्यान हा मुद्दा समोर येताच केंद्राने अॅनाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या परिस्थितीची चौकशी सुरू केली. गुरुवारी, कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की, असुरक्षित आणि शोषणकारक कामाच्या वातावरणाच्या आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे.