शेतीमाल खरेदी आणि वितरणाची व्यवस्था उभी करा, किसान सभेची मागणी
शेतीमाल खरेदी आणि वितरणाची पर्यायी व्यवस्था उभी करावी अशी मागणी
मुंबई : कोरनाच्या संकटामुळे शेतकरी आणि ग्राहकांसाठी शासनाच्या कृषी, सहकार व पणन या विभागांमार्फत शेतीमाल खरेदी आणि वितरणाची पर्यायी व्यवस्था उभी करावी अशी मागणी किसान सभेने केली आहे.
कोणतीही पर्यायी व्यवस्था उभी न करता प्रमुख शहरांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकरी तसेच ग्राहकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
साथीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती तंदुरुस्त रहावी यासाठी ताजी फळे, फळभाज्या व पालेभाज्या यांचा आहारात समावेश असावा अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. बाजार समित्या बंद केल्यामुळे हा आहार शहरी ग्राहकांना न मिळाल्याने त्यांच्या रोग प्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होणार असल्याचे वास्तव किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्राहकांना सहाय्यता व्हावी यासाठी शासनाच्या कृषी, सहकार व पणन या विभागांमार्फत शेतीमाल खरेदी व वितरणाची पर्यायी व्यवस्था उभी करावी असे पत्र नवले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
शेतकऱ्यांकडून तालुका स्तरावर शेतीमाल खरेदी करून नगर पालिका व नगर परिषदांच्या मार्फत शहरातील हौसिंग सोसायट्यांच्या मदतीने हा माल ग्राहकांपर्यंत पोहचावा आणि शेतकरी आणि ग्राहकांचे नुकसान टाळावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.