SSR case: संदीप सिंह यांच्यासोबतच्या `त्या` फोटोवर फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
काय म्हणाले माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस...
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. सुशांतसिंह प्रकरणी आता सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन यंत्रणा तपास करत आहेत. सीबीआय ड्रग्ज प्रकरणी संदीप सिंहची चौकशी करणार आहे. चौकशी दरम्यान संदीप सिंहचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संदीप सिंह आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे.
ट्विटरवर फोटो ट्विट करत सावंत यांनी 'सुशांत आत्महत्या प्रकरणातील भाजपाच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या मोदींच्या बायोपिकची निर्मिती संदीप सिंहने केली होती.
यावर काँग्रेसचे प्रवक्ते यांचा अभ्यास कमी पडत आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सचिन सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप सिंह हे बाळासाहेब ठाकरे यांच्या वर जो सिनेमा झाला त्याचेही निर्माते होते. एखाद्या कार्यक्रमात माझा त्यांच्या सोबत फोटो असेल तर काही फरक पडत नाही.
सचिन सावंत यांना विधान पारिषदेवर जायचं आहे त्यांना संधी मिळत नाही म्हणून ते निराश आहेत. शिवाय सुशांतसिंह प्रकरणात भाजपच्या कोणत्याही नेत्याने प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष आदित्य यांचं नाव घेतलं नाही.
मात्र ४० दिवस जे खुलासे समोर आले नाहीत ते सीबीआय आल्यावर येत आहेत, मग मुंबई पोलिसांवर कुणाचा दबाव होता? याचा तपास झाला पाहिजे त्याचप्रमाणे हार्ड डिस्क नष्ट कुणी केल्या हे समजलं पाहिजे असे प्रश्न देखील देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले. बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनानंतर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांशी संवाद साधला.