Air Hostess Murder : मुंबईतल्या एअर होस्टेस हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. सफाई कामगारानेच तिचा गळा चिरल्याचं उघड झालंय. या हत्येनं मुंबई हादरून गेलीय. काय घडलं या तरूणीसोबत. या कामगारानं का केली तिची हत्या याबाबत अनेक खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी रात्री पवईतल्या फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात रूपल ओग्रे या तरुणीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि अवघ्या काही तासांत मारेक-याला गजाआड केलं. विक्रम अटवाल असं या आरोपीनं नाव आहे. तो सफाई काम करणारा असून त्यानं रूपलच्या हत्येची कबुली दिली आहे. 


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रूपल ओग्रे छत्तीसगडची असून एअर होस्टेसचं प्रशिक्षण घेण्यासाठी ती मुंबई आली होती. बहिण आणि तिच्या मित्रासोबत ती मरोळच्या एनजी कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. ते दोघं आठ दिवसांपूर्वी गावी गेल्यानं रूपल एकटीच राहत होती. रविवारी नेहमीप्रमाणे रूपलने व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल करत कुटुंबियांशी गप्पाही मारल्या. त्यानंतर बराच वेळ रूपलशी संपर्क होत नसल्यानं तिच्या कुटुंबियांना धास्ती वाटू लागली. त्यांनी तिच्या मित्र परिवाराशी संपर्क साधून रूपलची चौकशी करण्यास सांगितलं. दरवाजाची बेल वाजवूनही दार न उघडल्यानं डुप्लिकेट चावीनं रूपलच्या फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा समोर जे दृष्य दिसलं ते पाहून सगळ्यांचाच थरकाप उडाला.


आरोपीच्या अंगावर नखांच्या खुणा


कारण रूपल रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला तातडीनं रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत सफाई कामगारांची चौकशी केली. त्यावेळी विक्रम अटवाल सफाई कामगाराच्या अंगावर नखांच्या खुणा दिसल्या. पोलिसांसमोर त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. 


विक्रमची रूपलवर ब-याच दिवसांपासून नजर होती. रूपलने त्याला बाथरूमचा चोकअप झालेला पाईप साफ करण्यासाठी बोलावलं होतं. हीच संधी साधत त्यानं रूपलवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असावा असा संशय आहे. मात्र या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे रूपलच्या हत्येनंतर काहीच घडलं नाही अशी आविर्भावात विक्रम वावरत होता. त्याच्या वागणुकीत कोणताच बदल दिसून आला नसल्याचं त्याच्या सहका-यांनी सांगितलंय.


2012 मध्ये अशाच प्रकारे अॅड. पल्लवी पूरकायस्थची मुंबईत हत्या झाली होती. सोसयटीचा सुरक्षारक्षक सज्जाद गनी पठाणने तिची हत्या केली होती. तर 6 जूनला चर्चगेटच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये अमरावतीच्या विद्यार्थिनीची हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणातील आरोपी वॉचमनचा संशयितरित्या मृत्यू झाला. आणि आता रूपल ओग्रेची हत्या झालीय.  एअर होस्टेस बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून रूपाली मुंबईत आली खरी मात्र तिची आणि तिच्या स्वप्नांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे मुंबईत तरुण मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.