जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर: मोदी सरकारच्या कार्यकाळात ज्याप्रमाणे हवामानाचे अंदाज चुकले, तसेच मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) आडाखे चुकतील, असे मत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केले. ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात हवामान खात्याचे अंदाज अनेकदा चुकले आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असून अर्ध्यापेक्षा जास्त गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजांप्रमाणेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल चुकतील. एवढेच नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) सर्वाधिक जागा मिळतील, असा दावाही नाना पटोले यांनी व्यक्त केला. नाना पटोले यांनी नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 


लोकसभा निवडणुकीचा सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान संपल्यानंतर रविवारी विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले होते. यापैकी बहुतांश एक्झिट पोलने भाजपप्रणित एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात कालपासून आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील ( रालोआ) नेत्यांना मंगळवारी दिल्लीत सहभोजनासाठी येण्याचे निमंत्रण दिल्याचेही समजते. 


तर दुसरीकडे एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे विरोधकांच्या गोटात मात्र शांतता पसरली आहे. भाजपप्रणित एनडीएला यंदा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. परिणामी यंदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा दावा विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी केला जात होता. मात्र, एक्झिट पोलच्या आकडेवारीने विरोधकांच्या मनसुब्यांना सुरुंग लावला आहे. यानंतर विरोधकांनी तुर्तास वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून सर्वजण २३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालांकडे डोळे लावून बसले आहेत.