अकोला : आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रीय दिसून येत आहे. याचाच फायदा काही लोक उठवत आहेत. सोशल मीडियावर फेक अकाऊंटचे प्रकार वाढीस लागले आहे. (Fake account on social media)  आणि यातूनच अलीकडे सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये फसवणूक करुन आपल्या जाळ्यात अडकवून अनेकांची आर्थिक लूट केली जात आहे. आता तर पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट अकाऊंट बनवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बनावट अकाऊंटच्या माध्यमातून फसवणूक करण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. (Fake account in the name of Akola Collector on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या महिन्यात यवतमाळ पोलीस अधीक्षक नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन मित्रांकडे पैश्यांची मागणी केली असल्याचा प्रकार उघड झाला होता. तर अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन चक्क अकोल्यातील काही प्रतिष्ठित नागरिकांकडून पैशाची मागणी करण्यात आल्याच समोर आले आहे. 


फसवणूक करण्याची बाब लक्षात येताच एका जागरुक नागरिकांने जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. जिल्हाधिकारी यांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या भामट्या विरोधात सिव्हिल लाईन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी पापळकर यांचा फोटो सुध्दा या बनावट अकाऊंटसाठी वापरण्यात आला आहे. या प्रकरणी अकोला जिल्हा सायबर सेलने केलेल्या प्राथमिक तपासणीत हे बनावट अकाऊंट राजस्थान येथील बाडनेर येथील असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आता सोशल मीडिया अकाउऊट हाताळताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.