`तो` इडली विकण्याबरोबरच करायचा असे धंदे... ऐकून पोलीसही हादरले
नाशिकमधल्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ, असा झाला इडलीवाल्याचा पर्दाफाश
सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी (Nashik Police) एका कारवाईत धक्कादायक माहिती उघड केली आहे. मुंबई नाका पोलीसांनी एका इडली विक्रेत्याला (Idli Seller) अटक करत त्याच्या कडून तब्बल पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा (Fake Currency) जप्त केल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा आढळल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या मुंबई नाका पोलीसांना मिळालेल्या तक्रारीवरुन नाशिक पोलीसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी सापळा रचत इडली विक्रेत्याला अटक केली. त्याच्याकडून दोन हजारच्या 264 नोटा आणि पाचशे रुपयांच्या 40 नोटा अशा पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. शहरात या कारवाईने खळबळ उडाली असून इडली विक्रेत्यांची धरपकड मोहिम सुरू असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
नेमकी काय आहे घटना?
नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका मातेच्या यात्रेत काही बनावट नोटांचा व्यवहार झाल्याच्या तक्रारी पोलीसांना मिळाल्या होत्या. तक्रारींच्या आधारे नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी सीसीटीव्हीची (CCTV) मदत घेत काही संशयितांची छायाचित्र जमा केली. यावुरन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. अखेर पोलिसांना यश आलं. एका इडली विक्रेत्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे लाखो रुपयांच्या बनवाट नोटा आढळून आल्या.
नाशिकमध्ये खऱ्या नोटांचा छापखाना आहे. पण आता बनावट नोटांचा छापखाना देखील सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. बनावट नोटांची टोळी सक्रिय असल्याचा पोलीसांना अंदाज आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काही संशयित पोलीसांच्या हाती लागतात का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.