तेलगी घोटाळा : आरपीएफ अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका
नाशिक सिक्युरिटी प्रेसमधून रेल्वेच्या वॅगनमधून कोट्यवधी रुपयांचे स्टॅम्पस गायब करण्यात आले होते
योगेश खरे, झी मीडिया, मुंबई : देशातील बहुचर्चित तेलगी घोटाळा म्हणून ओळखल्या गेलेल्या स्टॅम्प घोटाळ्याचा निकाल आज नाशिक जिल्हा न्यायालयानं सुनावलाय. बनावट मुद्रांक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा तुरुंगातच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या घोटाळ्यातील इतर आरोपी म्हणजेच रेल्वे पार्सल विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी निर्दोष सुटले आहेत.
नाशिक सिक्युरिटी प्रेसमधून रेल्वेच्या वॅगनमधून कोट्यवधी रुपयांचे स्टॅम्पस गायब करण्यात आले होते. अब्दुल करीम तेलगीनं आरपीएफ अधिकाऱ्यांच्या मदतीने हा ३२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होता. परंतु, सीबीआयच्या तपासात पुराव्यांची वानवा असल्यानं त्याचा फायदा आरोपींना मिळालाय.
२५ ऑगस्ट २००४ रोजी सीबीआयनं अब्दुल करीम तेलगी याच्यासोबतच सहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र कोर्टात सादर केलं होतं. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०१५ मध्ये संशयितांवर आरोपपत्र निश्चित करण्यात आले. या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर आयुक्त दर्जाच्या उच्च पदस्थांसहीत एकूण सात अधिकारी - कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं.
तसंच मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याचा शिक्षा भोगत असतानाच ऑक्टोबर २०१७ मध्ये मृ्त्यू झाला होता. त्यानंतर अब्दुलची पत्नी शाहिदा हिने विशेष न्यायालयाकडे अर्ज करून 'तेलगीची मालमत्ता आम्हाला नको... ती सरकारजमा करून घ्या', अशी मागणी केली होती. उल्लेखनीय म्हणजे, तेलगीची पत्नी शाहिदा हिलासुद्धा या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाकडून तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.