गडचिरोली: हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी महाराष्ट्राला सुन्न करणारी आणखी एक घटना समोर आली. मुलीने पळून जाऊन आंतरजातीय लग्न केल्यामुळे मुलीचे आई-वडील आणि भाऊ अशा संपूर्ण कुटुंबानेच विहिरीत उडू टाकून आत्महत्या केली. गडचिरोलीच्या विवेकानंद नगर परिसरात हा प्रकार घडला. रवींद्र वरगंटीवार, वैशाली रवींद्र वरगंटीवार आणि साहिल रवींद्र वरगंटीवार अशी या तिघांची नावे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीने अन्य जातीतल्या मुलाशी पळून जाऊन लग्न केल्याने मुलीचे कुटुंबीय नाराज झाले होते. संबंधित तरुणी एका शाळेत शिक्षिका होती. आपण प्रेमविवाह करणार असल्याची कल्पना दीड महिन्यापूर्वी घरी दिली होती. मात्र, मुलीला लग्नासाठी परवानगी नाकारण्यात आली. तरीही रविवारी या मुलीने मंदिरात जाऊन विवाह केला. 


त्यामुळे या तिघांना कमालीचा मानसिक धक्का बसला. अनेकांनी त्यांची समजूत काढल्यानंतरही ते प्रचंड अस्वस्थ होते. या अस्वस्थतेतून तिघांनीही सामूहिक आत्महत्येचं टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दुपारी बारा ते एकच्या सुमारास विवेकानंदनगर परिसरातल्या मोकळ्या जागेतल्या विहिरीत उड्या मारून या तिघांनी आत्महत्या केली.