Cyber Crime : सोशल मीडियामुळे अनेकजण रातोरात स्टार होत आहेत. यामुळेच सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्सचे लाखो, करोडो फॉलोअर्स असतात. अनेकजण सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्सच्या मदतीने पेड प्रमोशन करतात. मात्र, शहानिशा न करता पेड प्रमोशन करणे तीन सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्सना चांगलेच महागात पडले आहे. इन्स्टाग्रामवरुन लूट केल्याप्रकरणी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्स फसवणुकी प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. 


काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर क्रिप्टो करन्सीमुध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली लोकांची लूट केल्याप्रकरणी मुंबईच्या काळाचौकी पोलिसांत गुन्हा दाखल करयात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बंगालमधून एका आरोपीला अटक केली आहे. मोहम्मत हमजा झाकी अन्वर असं या आरोपीचं नाव आहे. इन्स्टाग्राम आयडीच्या माध्यमातून लोकांना सुरूवातीला 999 रूपये गुंतवण्यास सांगितले जायचे आणि अवघ्या 30 ते 40 मिनिटांत पैसे दामदुप्पट दिले जातील असं आश्वासन दिलं जात होतं. विशेष म्हणजे या प्रकरणात तीन सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्सनाही आरोपी बनवण्यात आलंय. अंकिता भगत, अक्षय आठरे आणि मानसी सुरवसे अशी त्यांची नावं आहेत. त्यांनी या पेजचं पेड प्रमोशन केलं होतं.  


रील्सस्टार पूजा भोईरला अटक


रील्सस्टार पूजा भोईरच्या मालमत्तांचा नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात आला. अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचा तिच्यावर आरोप आहे. सध्या कोठडीत असलेल्या पूजा भोईरनं शेअर्स घोटाळा करुन विदेश दौरा केल्याची माहिती तपासात समोर आली. या प्रकरणी नाशिक पोलीस अधिक तपास करताहेत. 


पुण्यात सायबर क्राईमच्या घटनेत वाढ


पुण्यात सायबर क्राईमच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. सोशल मीडियावर बदनामी होत असल्याच्या वर्षभरात 5 हजार तक्रारी पोलिसांकडे आल्यात. यात सोशल मीडियावर मैत्री करत अश्लील फोटो आणि व्हिडिओ पसरवण्याची भीती दाखवत खंडणीसाठी धमक्या दिल्या जातायेत.


महिलेला  91 लाखांचा गंडा


पुण्यातील एका महिलेला सायबर गुन्हेगारांनी चक्क 91 लाखांनी गंडा घातलाय.. या सायबर गुन्हेगारांची शक्कल पाहून पोलीसही चक्रावून गेलेत. फसवणूक झालेल्या महिलेला भामट्यांनी फोन करुन मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याची बतावणी केली. दुबईहून आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचं तिला सांगीतलं.. आणि तिला अंधेरीतील पोलिस अधिका-याशी संपर्क साधण्यास भाग पाडलं.  पीडित महिलेनं त्या अधिका-याशी संपर्क साधला असता त्याने महिलेला बँक खातं सील करणार असल्याची माहिती दिली. शिवाय तीन वेगळे अकाउंट नंबर्सही देत खात्यावरील पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगीतलं. चौकशी पूर्ण झाल्यावर पैसे परत देण्याचीही हमी दिली. पीडित महिलेनं पैसे ट्रान्सफर केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर पीडित महिलेनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फोनवरुन माहिती देऊ नका असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.