Parabhani News : मृत्यू कुणाला कधी कुठे कसा गाठेल याचा काही नेम नाही. ज्या शेतात घाम गाळला तिथेच एका शेतकऱ्याने प्राण सोडले आहेत.  सोयाबीन काढत असतांनाच शेतकऱ्याचा जीव गेला आहे. एक छोटासा रुमाल या शेतकऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. परभणी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.  


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील नैकोटा येथे हार्वेस्टींग मशीन मधून सोयाबीन काढत असतांना विचित्र घटना घडली.  गळ्यातला रुमाल हार्वेस्टींग मशीनच्या पंख्यात अडकून शेतकरी बेशुद्ध झाला. गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सोनपेठ तालुक्यातील बालासाहेब साठे अस मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.


गोंदियात फ्रीजचा स्फोट


फ्रीजचा स्फोट होऊन घराला आग लागल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात येत असलेल्या मुल्ला येथे घडली आहे. सरपंचासह गावकऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून मुल्ला येथील माजी पोलिस पाटील तेजराम वैद्य यांच्या स्वयंपाक घरात असलेल्या फ्रीजमधील कॉम्प्रेशरच्या टाकीचा स्फोट होऊन फ्रीजने पेट घेतला. यामुळे स्वयंपाक घराला आग लागली. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला. बागडे आणि गावकरी मदतीला धावले आणि त्यांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच घरातील वीजप्रवाह बंद करून आग आटोक्यात आणली. स्वयंपाक घरातील साहित्य जळाल्याने फ्रीजसह किरकोळ साहित्य या आगीत जळाले.


कल्याण बदलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू 


अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर रात्रीच्या सुमारास झालेल्या कारच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  मानव थारवाणी वय 18 आणि कौशल थावाणी वय 16 असे मृत झालेल्या तरुणांचे नाव आहेत. दोघेही उल्हासनगर मधील राहणारे होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हे दोघेही कल्याण बदलापूर महामार्गावरील रस्त्यावर कार मधून वेगात जात होते. यावेळी कार चालक मानव थारवाणी याचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही कार रस्त्याच्या कडेला आलेल्या झाडावर धडकली यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र हा अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला यावरूनच या अपघाताची भीषणता समोर आली आहे.