शिर्डी : पुणतांब्यातील अन्नत्याग केलेल्या तिन्ही मुलींची प्रकूती खालावली आहे. तिन्ही मुलींना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे. स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर या मुलींना हलविण्यात आले आहे. मुलींच्या रक्तातील साखर कमी झाल्याने आणि लिव्हर फंक्शन वाढल्याने तातडीने अहमदनगर येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, तीन मुलींपैकी एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. शुभांगी जाधव या तरुणीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी अहवाल दिला आहे. तिची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, या तरुणीची तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी भेट घेतली. दरम्यान, शुभांगीने रुग्णालयात जाण्यात नकार दिला आहे. त्यामुळे येथील परिस्थिती तणावाखाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणतांबा येथील शेतकरी कन्यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनामुळे शेतकरी कन्यांचे वजन घटू लागले होते. पुणतांबा ग्रामस्थांनी आज भिक मागो आंदोलन करुन ते पैसे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना मनीऑर्डरने पाठवले आहेत. दीड वर्षापूर्वी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘किसान क्रांती’च्यावतीने पुणतांबा येथे शुभांगी जाधव, पूनम जाधव, निकिता जाधव या उच्चशिक्षित शेतकरी कन्यांनी अन्नत्याग करून सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.


सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत सरकारला साडेचार वर्षांत काही केले नाही त्यामुळे सरकारला पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी भिक मागून पैसे गोळा केलेत.गावात झोळी करुन मागितलेल्या या भीक आंदोलनातुन जमा झालेले ४७४ रुपये सरकारला पाठविण्यात येणार असल्याच शेतकऱ्यांनी सांगितले.