कर्ज फेडण्यासाठी शेतमजुरावर किडनी विकण्याची वेळ
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी
मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : घरासाठी त्यांनी कर्ज काढलं.. ते फेडण्यासाठी कष्टाची कामं सुरु होती.. मात्र काम करतानाच अपघात झाला.. शरिरात ना कष्ट करण्याची रग राहिली ना उत्पन्नाचं दुसरं साधन.. अखेर या शेतमजुरानं स्वत:ची किडणीच विकायला काढली... कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या शेतमजुराची ही करुण कहाणी..
जनार्धन रामचंद्र राऊत हे अगदी पत्र्याच्या खोपटात राहतात. जनार्दन हे भूमीहीन शेतकरी असून त्यांच्यासोबत ९० वर्षांची आई आणि विधवा भावजईसोबत ते या घरात राहातात. मजूरी हे त्यांच्या उत्पन्नाचं एकमेव साधन. मिळेल ते काम करत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.. मातीच्या घरात रहाणाऱ्या जनार्दन यांनी उसनवारी करुन हे पत्र्याचं घरही बांधलं. मात्र एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीचं काम करताना ते पन्नास फूट खोल विहिरीत पडले आणि त्यांच्या पायला गंभीर दुखापत झाली. पायाचं ऑपरेशन झालं आणि औषधावर वारेमाप खर्चही झाला.
ज्या शरिराच्या भरोशावर आतापर्यंत ते नेटानं उभे होते ते शरीरच जायबंदी झालं. कुटुंबाचा आधार असलेल्या जनार्दन यांना आता काठीचा आधार घेत चालावं लागतं आहे. अशात आता जगायचं कसं, कर्ज कसं फेडायचं आणि घर कसं बांधायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. यातच कुटुंबातील दोन महिलांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. 'घरात पुरूष एकच असल्यामुळे सर्वच जबाबदारी त्यांच्यावर होती. आता पायाचा अपघात झाल्यामुळे घरं कसं चालवायचं हा प्रश्न आमच्यासमोर आहे,' असं जनार्धन यांची भावजय उषा राऊत सांगतात.
कष्टाचं काम करता येत नसल्यानं जनार्दन यांनी स्वत:ची किडणी विकण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. अद्याप त्यांच्याकडून कोणतीही परवानगी मिळाली नाही. पण आता हा शेवटचा पर्याय माझ्याकडे राहिल्याचं, जनार्धन राऊत सांगतात. कष्ट करण्याची तयारी आहे मात्र आता शरिरानं साथ सोडली आहे. अशा शेतमजुराला गरज आहे ती समाजातील दानशूर हातांची.