मयुर निकम, बुलढाणा : पीककर्ज मिळत नसल्याने  कंटाळून  शेतकऱ्यांनी त्यांची किडनी 50 हजाराला विकायला काढली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली आहे.  एकतर पीककर्ज द्या नाहीतर आमच्या किडन्या विका अन पेरणीसाठी आम्हाला पैसे द्या या मागणीने जिल्ह्यात एकच खळबळ उडालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी बँकेचे आणि सावकाराचे कर्ज काढून पेरणीची तयारी करणारा शेतकरी याही वर्षी कर्जावर अवलंबून आहे. कारण मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे पूर्णतः नुकसान झालं होतं त्यामुळे आवक मिळालीच नाही, परिणामी मागील वर्षी घेतलेले पीक कर्ज तो फेडू शकला नाही. 


आता खरीप हंगाम सुरू झालाय. पेरणी करायची म्हणजे पैसा लागणारा आणि पैसा हा कर्जाशिवाय कुठून उभा राहणार हा यक्षप्रश्न शेतक-यांसमोर आहे. त्यामुळे तो कर्ज मिळवण्यासाठी  बँकेमध्ये चकरा मारतोय.


मागील वर्षीच थकलेलं कर्ज पाहता बँक प्रशासन त्याला दारात उभे करत नाही त्यामुळे कंटाळून वाकोडी गावातील दीपक पाटील, योगेश काजळे, दीपकसिंह गौर, सतीश काजळे, नितीन पाटील या 5 शेतकऱ्यांनी  काळजाला घर पाडणारी मागणी केली आहे. मुख्यमंत्री साहेब एक तर पीक कर्ज द्या नाहीतर आमच्या किडन्या पन्नास हजाराला विकत घ्या जेणेकरून आम्ही शेतात पेरणी करू शकू.


अजून पर्यंत शासनाने पुनर्गठन चे कोणत्याही प्रकारचे आदेश दिले नाहीत त्यामुळे आम्ही पुनर्गठन करून संबंधित शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकत नसल्याचं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.