नाशिक : राज्यात विशेषत: मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालं आहे. लाखो हेक्टरवर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाड्यासंदर्भात राज्य सरकारने दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे. 


आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.


मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं


मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.