मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद: गेल्या चार-पाच वर्षांपासून अल्प पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्त्यातील शेतकरी हैराण आहे. पेरणीसाठी सोडा पण शेतकऱ्यांच्या मदतीला असलेल्या सर्जा-राजा यांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा मोठा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला होता. अशात काहींना प्रशासनाने उभारलेल्या चारा छावण्याचा आधार झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगरूळ या गावचे रहिवासी असलेल्या फरताडे कुटुंबीयांकडे असलेले जेमतेम कोरडवाहू शेती आणि बिकट आर्थिक परिस्थिती यामुळे त्यांना बैलजोडी विकायची पाळी आली. यामधून मिळालेल्या पैशात त्यांनी आपल्या कुटुंबाचा गाडा हाकला.


सध्या उशिरा का होईना जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडल्यामुळे बळीराजा पेरणीच्या लगबगीला लागला आहे. कोणी ट्रॅक्टरने तर कोणी आपल्या बैल जोडीने शेत नांगरून पेरणी करत आहेत. मात्र, फरताडे दाम्पत्याकडे बैल नसल्याने स्वत:ला नांगराला जुंपून पेरणी करत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.



एकीकडे उशिरा पाऊस पडल्याने हातचा मूग आणि उडीदाचं पीक हातून गेलं आहे. त्यामुळे  शेतकरी सोयाबीनच्या पीकावर जास्त भर देत आहे. पावसाने चांगली साथ दिली आणि चांगला हमीभाव मिळाला तर शेतकरी सुखी होणार आहे. मात्र, एक-दोन एकर शेती असलेल्या आणि बैलजोडी नसलेल्या फरताडे कुटुंबियांपुढे शेतीतून कितपत उत्त्पन्न निघणार, हा प्रश्न आ वासून उभा आहे.