Vidhansabha Election: विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सोयाबीन दराचा मुद्दा चर्चेत आला होता. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतदेखील सोयाबीन फॅक्टर सत्ताधाऱ्यासाठी डोकेदुखी ठरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, निवडणूक संपताच चार हजाराच्या आत असलेले सोयाबीनचे दर शुक्रवारी अचानक पाच हजाराच्या वर गेले. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात यंदा सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला होता. एकूण खरीप क्षेत्राच्या ३४ टक्के क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला होता. उत्पादनही विक्रमी येणार असाच अंदाज होता. सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ४८९२ रुपये इतके किमान आधारभूत मूल्य जाहीर केले असले तरी सुरुवातीच्या काळात हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात होती. निवडणुकीनंतर शेतकरी हमीभाव केंद्राकडे वळू लागले असून विविध बाजारसमित्यांमध्येही व्यापाऱ्यांकडून वाढीव दराने सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली आहे. 


पिवळ्या सोयाबीनला चांगला भाव


विविध बाजारसमित्यामध्येही व्यापाऱ्यांकडून वाढीव दराने सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. विशेषतः पिवळ्या सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. 


दरम्यान, विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षाच्या प्रचाराचा मुद्दा हा सोयाबीनचे दर हाच होता. राजकीय पक्षाच्या जाहिरनाम्यातही सोयाबीनचा मुद्दा चर्चेचा ठरला होता. एमएसपीवर भावांतर योजना लागू करुन सोयाबीनला 6000 भाव देणार, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी एका प्रचारसभेत केली होती. मराठवाडा आणि विदर्भात हा मुद्दा अधिक चर्चेत आला होता. 


वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनची आवक घटली


पश्चिम विदर्भातली सर्वात मोठी सोयाबीन ची बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत दरदिवशी 7ते 8 हजार क्विंटल सोयाबीनची आवक असते मात्र ही आवक घटली असून सध्या तीन ते साडेतीन हजार क्विंटल आवक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत आहे.