मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न राज्य सरकारसमोर आव्हान म्हणून उभा आहे. अवकाळी पाऊस, कर्जमाफी अशा अनेक गंभीर प्रश्नांमुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्याचे राज्यस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांना समुपदेशन करणं, या समस्येतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभुमीवर उद्यापासून तालुकास्तरावर शेतकरी समन्वय समितीसह शेतकरी सन्मान आणि मार्गदर्शन कक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या समितीची दर तीन महिन्यांनी बैठक होणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन उपाययोजना सुचविण्यात येतील. हवामान, पीक परिस्थिती, विपणन, पीककर्ज, शेतीपूरक जोडव्यवसाय याबाबत समितीच्या बैठकीत चर्चा होईल. 



यामुळे शेतकऱ्यांना योजनांची माहिती मिळणं सोपं होणार आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक खिडकी तत्वावर शेतकरी सन्मान आणि मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षात स्वतंत्र बैठक व्यवस्थेसोबत पिण्याचे पाणी, शेतीविषयक पुस्तके, विविध योजनांची माहिती पुस्तके, ठेवण्यात येणार आहे.