विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही पावसाचं आगमन झालं नसल्याने शेतकऱ्याने मोठा धोका पत्करलाय. पावसाची वाट न पाहता कापूस, मका तसेच इतर कडधान्य पिकांची धुळपेरणी सुरु केली आहे. लाखो रुपयांचे बियाणे शेतीत टाकून शेतकऱ्यांनी एकप्रकारे सट्टाचं लावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन होते. मात्र, यंदा जून महिना संपायला आला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. यावर्षी ७ जूनपासून मृग नक्षत्र सुरू झालंय. मात्र, संपूर्ण नक्षत्र कोरडेच गेले. आता शनिवारपासून आद्रा नक्षत्र लागलंय. नक्षत्र बदलल्यानंतर रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पाऊसधारा कोसळल्या. मात्र पेरणीलायक पाऊस अजूनही झालेला नाही. 


नक्षत्र बदलानंतर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. त्यामुळे पेरणी योग्य पाऊस झालेला नसला तरी शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून कापूस, मका, ज्वारी, बाजरी तसेच इतर कडधान्य पिकांची धूळपेरणी सुरू केली. यावर्षी आधीच पाऊस लांबलाय. अचानक पाऊस आला तर पेरणीची धावपळ होऊ नये, यासाठी अनेकजण धूळपेरणी करत आहेत.


धूळपेरणी केल्यानंतर पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवेल. हे संकट येऊ नये, यासाठी जमिनीत पुरेशी ओल झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.


जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या वर्षी देखील जूनच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर पावसाचे आगमन लांबलं होतं. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलं. आता यंदादेखील पाऊस लांबलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच पेरणी करणे हिताचे ठरणार आहे.