योगेश खरे, चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी संघटनेनं कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन पुकारलं आहे. यामुळे ऐन सणासुदीला कांद्याचा भाव भडकण्याची चिन्हं आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशातून येणारा उन्हाळ कांदा संपल्यानंतर आणि आंध्रप्रदेश, कर्नाटकातील पुरामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला. लासलगाव बाजार समितीमध्ये भाव ५१०० रुपयांपर्यंत गेले. त्यामुळे आठ दिवसांत केंद्राचं पथक २ वेळा लासलगावला आलं.


या पथकाच्या अहवालानंतर केंद्रानं कांद्याला निर्यातबंदी केली आणि साठ्यावर 500 क्विंटलची मर्यादा आणली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. यापुढे कांदा विक्री करणार नसल्याचं पत्र शेतकरी संघटनेनं लासलगाव बाजार समितीला दिलंय.


कांदा हा नाशवंत असल्यामुळे विक्रीला बाहेर काढला नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, तरीही शेतकऱ्यांनी आंदालनाचं हत्यार उपसलं असताना केंद्र सरकारनं आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होतेय. 



या आंदोलनाचा परिणाम जाणवायला लगेचच सुरूवात झालीये. नाशिक जिल्ह्यातल्या २३ बाजार समित्यांमध्ये आवक कमी झाल्यामुळे एका दिवसात क्विंटलमागे ८०० रुपयांनी भाव वाढलाय.


ऐन सणासुदीला कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढेलच, पण निवडणूक तोंडावर असल्यामुळे आपले डोळेही पाणावणार नाहीत, याची काळजी सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागणार आहे.