बापाचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नात्याला काळीमा फासणारी घटना
नितेश महाजन, झी मीडिया, जालना : नराधम बापानं पोटच्या अल्पवयीन मुलीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर शहरात घडली आहे. या प्रकाराची वाच्यता होऊ नये, यासाठी पीडित मुलीची आई आणि दोन मावशांनी तिला डांबून ठेवलं. या सगळ्यांविरुद्ध आता गुन्हा दाखल झाला आहे. ज्या बापानं जन्म दिला, त्या बापानंच अब्रूवर घाला घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जालन्याच्या परतूर शहरात गेल्या वर्षभरापासून हा नराधम बाप पोटच्या मुलीवर बलात्कार करत होता. वडिलांच्या एका मित्रानं देखील पीडित मुलीचा विनयभंग केला. हा सगळा प्रकार पीडित मुलीनं आपल्या आईला आणि २ मावशांना सांगितला. मात्र त्यांनी मदत करण्याऐवजी मुलीलाच घरात डांबून ठेवलं. कशीबशी स्वतःची सुटका करून या पीडित मुलीनं मुंबईतील आझाद मैदान गाठलं आणि उपोषण सुरू केलं. आझाद मैदान पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल करून तो गुन्हा परतूर पोलिसांकडं वर्ग केला. त्यानंतर परतूर पोलिसांनी आरोपी वडील आणि त्यांच्या मित्राला अटक केली.
याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीची आई तसंच 2 मावशा यांना देखील अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. वडील आणि मुलीच्या नात्याला या प्रकारामुळे काळीमा फासला गेला आहे. पीडित मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पण तिच्या मनावरची ही जखम कधी बरी होईल? हा मोठा प्रश्नच आहे.
गेल्या कित्येक घटनांमधून मुली सुरक्षित नसल्याचं समोर आलं. मात्र, जालनातील या घटनेने मुली घरीदेखील सुरक्षित नसल्याचं अधोरेखित झालं आहे.