FIFA : नागपूरच्या पोट्ट्याला थेट कतारमध्ये सामना पाहण्याची सुवर्णसंधी; फिफाने दिले निमंत्रण
फिफा वर्ल्ड कप मॅचचे तिकिट मिळवण्यासाठीही चाहत्यांना मोठा संघर्ष करावा लागतोय. मात्र फिफाकडून नागपुरातील फुटबॉलपटूला निमंत्रण देण्यात आलय.
अमर काणे, झी मीडिया, पुणे : फुटबॉल वर्ल्डकपचा (FIFA) ज्वर सध्या संपूर्ण जगावर चढलाय. आशिया खंडात दुसऱ्यांदा होत असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या निमित्ताने आपल्या लाडक्या स्टार फुटबॉलपटूंचा (Football) खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. पण प्रत्यक्षात हे सामने पाहणे हे फुटबॉलप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. फिफाच्या व्यासपीठावर सामने पाहण्याची संधी फार कमी लोकांना मिळत असते. फिफा वर्ल्ड कप मॅचचे तिकिट मिळवण्यासाठीही चाहत्यांना मोठा संघर्ष करावा लागतोय. मात्र फिफाकडून वर्ल्ड कप सामने पाहण्यासाठी नागपुरातील (Nagpur) एका फुटबॉलपटूला निमंत्रण देण्यात आलय.
नागपूरच्या स्लम सॉकरमधील शुभम पाटील फुटबॉलपटूला फिफाचे आमंत्रण मिळाले आहे. फिफा वर्ल्ड कप शुभम पाटील हा फुटबॉलपटू कतारला पोहोचला आहे. अनेक स्टार फुटबॉलपटूंनी गरीबीतून मोठा संघर्ष करून जगात नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळेच फुटबॉलच्या सर्वात मोठ्या स्पर्धेचे आयोजन करताना फिफाकडून स्लम सॉकर खेळणाऱ्या असलेल्या फुटबॉलपटूंचा सन्मान करते. शुभम पाटील हा स्लम सॉकर खेळणारा असाच एक फुटबॉलपटू आहे.
शुभम पाटीलने फुटबॉलच्या माध्यमातून त्याने आपलं नाव मोठे केले. स्लम सॉकरमधील त्याची गुणवत्ता बघून फिफाने त्याला वर्ल्ड कपची मॅच पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. हे निमंत्रण मिळाल्यानंतर स्लम सॉकरचे जनक विजय बारसे यांचा हा शिष्य कतारला पोहचला आहे. स्लम सॉकरच्या माध्यमातून झोपडपट्टीतील आणि गैरमार्गावर लागलेल्या अनेक मुलांना फुटबॉलपटू बनवण्याचा काम गेल्या अनेक वर्षापासुन फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे करत आहे. अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटाच्या माध्यमातून विजय बारसे यांची कहाणी सर्व जगासोमर आलीय. त्यानंतर आता फिफाने विजय बारसे यांच्या या शिष्याला विश्वचषक पाहण्यासाठी थेट कतारला बोलवण्यात आले.
शुभम पाटील हा तरुण विजय बारसे यांच्या स्लम सॉकरचे प्रतिनिधित्व करत फिफा विश्वचषक पाहण्यासाठी कतारला पोहचला. फुटबॉलमुळे शुभमच्या जीवनाला कलाटणी तर मिळालीच. फुटबॉलच्या सर्वात मोठ्या व्यासपीठावर जाऊन स्टार फुटबॉलपटूंचा खेळ पाहण्याची संधी सुद्धा त्याला मिळाली.