अपघात झालाय, मदतीसाठी पैसे हवेत म्हणत ठकबाजाकडून आमदाराची फसवणूक; नागपुरातील प्रकार
Nagpur Crime News: नागपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ठकबाजाने थेट आमदारांचीच फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Nagpur Crime News: देशात सायबर क्राइम आणि सायबर फ्रॉडचे प्रकार वाढले आहेत. अनेक नागरिकही या भामट्यांवर विश्वास ठेवून विश्वासाने त्यांची माहिती देतात. परिणामी त्याचा फायदा घेत सायबर चोरटे हातोहात लाखो करोडोंची रक्कम लंपास करतात. पोलिस सायबर क्राइम यावर आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत. तसंच, आपली खासगी माहिती अज्ञात व्यक्तीला देऊ नये, असं आवाहनही करण्यात येत आहे. मात्र, तरीरी नवीन कल्पना लढवत चोरटे सर्वसामान्यांना लुबाडत आहेत. सर्वसामान्यांनाबरोबर आता नेत्यांनाही सायबर चोरट्यांचा फटका बसला आहे. एका व्यक्तीने 6 हजार रुपयांची गरज असल्याची खोटी बतावणी करून आमदाराची फसवणूक केली आहे. नागपूरमध्ये हा प्रकार घडला आहे. (Nagpur News Today)
अपघातात परिवारातील लोक मृत्युमुखी पडले आहे, त्यामूळे रुग्णवाहिका आणि इतर बाबीकरता करता तातडीने 6 हजार रुपयांची गरज असल्याची खोटी बतावणी करून आमदाराची फसवणूक करण्यात आल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर लकडगंज पोलिसांनी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. प्रवीण कडू (रा. पालघर) असे आरापीचे नाव आहे.
ठकबाजाने भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची आर्थिक फसवणूक केली. आमदार कृष्णा खोपडे व त्यांचे सहकारी अरुण हारोडे 26 एप्रिला मुंबईला जात होते. या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर प्रवीण कडू या ठकबाजचा फोन आला. त्याने आपले नाव व पत्ता सांगून कुटुंबासह ठाणे येथे प्रवासादरम्यान त्याच्या वाहनाला ठाणे येथे अपघात झाल्याची माहिती दिली. तसेच या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून रुग्णवाहिकाही मिळत नाही व नागपूरला परतण्यासाठी डिझलचे पैसेही नसल्याची बतावणी करीत ६ हजार रुपयांची मागणी केली.
महत्त्वाचं म्हणजे या ठगबाजाने आमदारांना स्वतःचा परिचय देताना आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व परिचित असलेले नाव व ठिकाण ही सांगितले. आमदार खोपडे यांनी तत्काळ सहकारी हारोडे यांच्या मार्फत प्रवीण कडूच्या खात्यात 6 हजार रुपये वळते केले. मात्र आमदार खोपडे नागपूरला परतल्यावर कडू परिवार सुखरूप असल्याचे निदर्शनास आले. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या ठकबाजाने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यताही आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली आहे.