नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालना जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दोन हजारांवर गेली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येच्या 87 टक्के रुग्ण शहरात असल्याने प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्या आणि सोशल डिस्टंन्सिंगचं पालन न करणाऱ्या नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 2121 वर गेला आहे. तर आतापर्यंत 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जालना शहरात कोरोना बाधितांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने पोलिसांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आणि सोशल डिस्टंसिंग पाळणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मास्क न वापरणाऱ्या आणि सोशल डिस्टंन्सिंग न पाळणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारला जात असून वेळप्रसंगी गुन्हा देखील दाखल केला जात आहे. जालना शहरात लॉकडाऊनपासून आतापर्यंत 2 हजार केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तर 4 आतापर्यंत लाखांचा दंडदेखील वसूल करण्यात आला आहे.


मास्क न वापरल्यामुळे आजपर्यंत पोलिसांकडून झालेल्या दंडामुळे मास्क वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरात फिरणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडावर मास्क दिसून येतोय. कामाशिवाय कोणीही शहरात फिरु नये, फिरताना मास्क वापरावा असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.


20 दिवसांचा लॉकडाऊन असतानाही शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली. त्यामुळे पोलिसांना देखील कडक भूमिका घ्यावी लागली आहे. आता शहरात पुन्हा हा आकडा वाढू नये म्हणून शहरातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क तर वापरावच, पण सोशल डिस्टंन्सिंगचंही पालन करणं गरजेचं आहे.