बदलापूर : राज्यभरातील आगीच सत्र काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. विशेषत: मुंबई आणि आजुबाजूच्या शहरात गेले महिनाभर अग्नितांडव सुरू आहे. बदलापूरमध्ये रसायनाच्या कंपनीला आग लागल्याची घटना नुकतीच समोर येत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दल माहिती समोर आली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्लॅटीनम पॉलिमार कंपनीला ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. 


माणकीवली एमआयडीसीत प्लॅटीनम पॉलिमाँर कंपनी आहे. काहीवेळापूर्वी केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याचे समोर येत आहे. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. बदलापूर ,अंबरनाथ ,उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यास शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. शुक्रवारी येथील एमआयडीसी कंपनीला सुट्टी असते त्यामुळे सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. प्लास्टिक केमिकल कपंनी असल्याने आगीने जोरात पेट घेतला. दोन ते तीन किलोमीटर दूरवर आगीचे लोण पाहायला मिळत आहेत.