कल्याण : कल्याण पूर्व भागातून तेलंगणाचे राहणारे १२१ मजूर बुधवारी रात्री तेलंगणासाठी रवाना झाले. कल्याण भागात घर बांधकाम करणारे हे सर्व मजूर मुळचे तेलंगणा येथील राहणारे असून ते येथे कामासाठी येत असतात. लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. त्यामुळे अशा लोकांचे येथे हाल होत आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अशा मजुरांना आपल्या राज्यात परत जाण्यासाठी परवानगी दिल्यानंतर अनेक भागातून मजूरवर्ग आपल्या राज्यात परतत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण पूर्ण येथून पहिल्यांदाच या ५ बसेस रवाना झाल्या. खडेगोळवलीमधून जवळपास १२१ जणांना घेऊन या बसेस तेलंगणासाठी रवाना झाल्या आहेत. समाजसेवक मनोज माळी यांच्या प्रयत्नातून तसेच कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या सर्व मजुरांना आपल्या राज्यात पाठवण्यात आलं. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर या सर्वांना आपल्या राज्यात परत जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली.


वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्यानंतरच गावी जाण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. खाजगी वाहनानेही प्रवास करता येणार आहे. तर परराज्यात जाण्यासाठी राज्य सरकार गरजेनुसार रेल्वेची व्यवस्था करत आहे.