नागपूर : नागपुरात एका 51 वर्षीय मुलाने आपल्या 75 वर्षीय आईचा चाकूने वार करून खून करत स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीनिवास चोपडे असे आरोपी मुलाचे नाव असून लीला चोपडे असे हत्या झालेल्या आईचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धंतोली पोलीस स्टेशनअंतर्गत हिंदुस्थान कॉलनीमधील प्रशस्त बंगल्यात हे दोघे राहत होते. गेले तीन ते चार दिवस दोघांकडून नातेवाईकांच्या फोनला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नातेवाईकांना शंका आली.


एका नातेवाईकाने काल हिंदुस्तान कॉलोनीमधील बंगल्यावर येऊन पाहणी केली असता त्यांना बंगला चारही बाजूने बंद आढळला. त्यांनी पोलिसांच्या मदतीने घराचे दार तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांना लीला चोपडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या पोटावर चाकूने वार केल्याचे आणि मृतदेहाशेजारीच हल्ल्यासाठी वापरलेले चाकू दिसून आले.


तर काही अंतरावर मुलगा श्रीनिवास विष प्राशन करून मृत आढळला. आरोपी मुलगा श्रीनिवास इंजिनिअर असून त्याने लग्न केले नव्हते. गेले 20 वर्षे तो नोकरीही करत नव्हता. वडिलोपार्जित मोठ्या बंगल्यात तो आईसह राहत होता.


वडिलांच्या निवृत्ती वेतनावर दोघांचे जीवन सुरु होते... धंतोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास आणि त्याच्या आईचे मृतदेह चार ते पाच दिवस पूर्वीचे असून ते कुजलेल्या स्थितीत आढळून आले.


श्रीनिवास याने असे आत्मघातकी पाऊल का उचलले याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी हत्या व आत्महत्येचे प्रकरण दाखल करून तपास सुरु केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवले आहे.