Vasai Fort Leopard: वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात (Vasai Fort) बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून बिबट्या या परिसरात फिरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर, वनविभागाकडून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्यापही बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले नाहीये. (Vasai Fort News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात बिबट्याने दहशत माजवली असून येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. बिबट्याच्या वावरामुळं प्रशासनाकडून पर्यटकांना किल्ला परिसरात येण्यास मनाई केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती विभागाला दिली असून किल्ला परिसरात वन विभागामार्फत बिबट्याचा शोध घेतला जात आहे.


वसई किल्ला परिसर हा निम्म्याहून अधिक समुद्राला लागून असल्याने हा बिबट्या नेमका कुठून आला असावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या बिबट्याला ट्रॅप करण्यासाठी किल्ला परिसरात वनविभागाकडून कॅमेरेही लावण्यात आले आहेत. तर बिबट्याच्या वावरामुळं गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पाच दिवस उलटूनही हा बिबट्या वनविभागाला सापडला नसल्याने किल्ल्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. 


वसई पश्चिमेच्या भागात हा ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याच्या परिसरात अनेक झाडे-झुडपे आहेत. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीने बिबट्याला धडक दिल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. या घटनेची माबिती मिळताच वनविभागाला लगेचच माहिती देण्यात आली. तसंच, खात्री करण्यासाठी ट्रॅप कॅमेरेदेखील लावण्यात आले. या कॅमेऱ्यात बिबट्याची दृश्ये कैद झाली आहेत. 


किल्ल्याला लागूनच नागरी वस्ती व कोळीवाडा आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी व सकाळी या भागातील रस्त्यावर नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जातात. आजूबाजूला दाट झाडी असल्यामुळं बिबट्या दिसणार नाही. त्यामुळं नागरिकांवर हल्ला होण्याचीही शक्यता असते. नागरिकांनी रात्रीच्या वेळी किल्ला परिसरात जाणे टाळावे, असं अवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.  तसंच, या परिसरात बिबट्या आला कुठून याचा शोधही घेण्यात येत आहे. मात्र वसईत इतक्या वर्षांत पहिल्यांदाच बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.