मत्स्य प्रदर्शन बच्चे कंपनीसाठी खास पर्वणी
वीकेंडला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळं हे मत्स्य प्रदर्शन बच्चे कंपनीसाठी तर खास पर्वणी ठरतंय.
विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली : मुंबईतलं तारापोरवाला मत्स्यालय आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. पण डोंबिवलीतलं मिनी मत्स्यालय देखील सध्या आकर्षणाचं केंद्र ठरतंय. वीकेंडला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळं हे मत्स्य प्रदर्शन बच्चे कंपनीसाठी तर खास पर्वणी ठरतंय.
विविध आकारांचे दुर्मिळ मासे
डोंबिवली शहरात सध्या झलक पाहायला मिळतेय ती ब्ल्यू रिव्होल्युशनची. उतेकर फिशरीजच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या अॅक्वा या अनोख्या मत्स्य प्रदर्शनात रंगीबेरंगी, विविध आकारांचे दुर्मिळ मासे ठेवण्यात आलेत.
सुमारे 2 फुटांपर्यंत लांबीचे अनेक मासे
आपल्या हाताच्या नखाच्या आकारापासून ते सुमारे 2 फुटांपर्यंत लांबीचे अनेक मासे. जगातला सर्वात महागडा अडीच लाख रूपये किंमतीचा एक एरोवाना मासाही इथं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या माश्याला चीनमध्ये देवासारखं पुजलं जातं.
‘गॉड ऑफ चायना’
चांगल्या, सकारात्मक गोष्टींचं आणि भरभराटीचं प्रतिक म्हणून ‘गॉड ऑफ चायना’ नावानं तो ओळखला जातो. एरोवाना माशाबरोबरच ट्रॉपिकल फिश, चिकलीड फिश, स्टार फिश, ऑरनामेंटल फिश, जेलिफिश, पारदर्शक मासे, सागरी वनस्पतींसह दुर्मिळ ऑक्टोपसही इथं पाहायला मिळतात.
मत्स्यालयासंबंधी आवश्यक उपकरणं
माशांना हाताळण्याची, त्यांना स्पर्श करण्याची खास सोय करण्यात आल्यानं बच्चे कंपनी कमालीची खुश दिसत्येय. त्याशिवाय मत्स्यालयासंबंधी आवश्यक उपकरणं, आकर्षक सजावट साहित्य, विविध एक्सेसरीज देखील इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
मत्स्य प्रदर्शन 28 जानेवारीपर्यंत
डोंबिवलीच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडा दालनात भरलेलंल हे मत्स्य प्रदर्शन 28 जानेवारीपर्यंत खुलं असणार आहे.. अगदी वेळ काढून या माश्यांना भेटायला जायला हवं.