रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदीचा काळ सुरु असताना समुद्रात मासेमारी करणाऱ्या सात नौका मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने पकडल्या आहेत. या नौकेवरील २० हजार ४०० रुपये किमंतीची मासळी जप्त केली. १ जून पासून यांत्रिकी पद्धतीने होणाऱ्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली असताना अनेक नौका बंदीचा आदेश झुगारून समुद्रात मासेमारी करत असल्याचे आढळून आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत मिरकरवाडा बंदरात मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने धडक कारवाई करत सात नौका पकडल्या आहेत. त्यामध्ये आतिफ हमीद मिरकर (रा. मिरकरवाडा) यांची मोहम्मद सियाम या नौकेवर ६०० रुपयांची मासळी, साजिद हसनमियाँ मिरकर (रा.भाटकरवाडा) यांच्या गोवर्धन प्रसाद या नौकेवरील तीन हजार रूपयांची मासळी, संजय रघुनाथ चव्हाण (रा. गुहागर) यांच्या दशभूज लक्ष्मी गणेश या नौकेवरील एक हजार रूपयांची मासळी जप्त करण्यात आली आहे.


विष्णू भाग्या डोर्लेकर (रा. गुहागर) यांच्या पांडुरंग प्रसाद नौकेवरील ६ हजार रूपये किमतीची मासळी, आत्माराम हरी वासावे (रा. गुहागर) यांच्या पिंपळेश्वर सागर या नौकेवरील ४२०० रुपयांची मासळी, दिलीप राघोबा नाटेकर (रा. गुहागर) यांच्या सर्वेश्वरी नौकेवरील ३६०० रुपयांची मासेमारी, मोहम्मद रफिक अ. भाटकर (रा. राजिवडा) यांच्या मोहम्मद शयान नौकेवरील दोन हजार रूपये किंमतीची मासळी पकडली.