मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात, पाच ठार
इको कार आणि बसच्या या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती हाती येतेय. इको कार आणि बसच्या या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत तर चार जण गंभीर जखमी आहेत. रत्नागिरी - लांजा रस्त्यावर वाकेड इथं हा अपघात झालाय.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. मुंबईहून राजापूरला चाललेल्या इको गाडीला लांजा इथं भीषण अपघात झालाय. इको आणि बसची समोरासमोर धडक झाली... आणि या अपघातात इको गाडीतून प्रवास करणाऱ्या सर्वांचा अर्थात पाच जण जागीच ठार झालेत तर बसमधील पाच प्रवासी जखमी झालेत.
या अपघातात मारुती मांजरेकर नावाचे गृहस्थ प्रवास करत होते. काही दिवसांपूर्वीच घेतलेली इको गाडी घेऊन ते गणेशोत्सवासाठी आपल्या कोंडेगाव या गावी निघाले होते.
अपघातग्रस्त लक्झरी बस सिंधुदुर्गहून मुंबईला निघाली होती. जखमींवर लांजातल्या ग्रामीण रुग्णालय आणि रत्नागिरीच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.