चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, अनेक गावे पाण्याखाली
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात पूरस्थिती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.
चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात पूरस्थिती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. पूर्व विदर्भात पूरस्थिती बिकट झाली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला मोठा फटका बसला आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. घरांचं, शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. सध्या वैनगंगा नदीकाठच्या २१ गावांना पुराचा तडाखा बसला आहे. या गावांमधील पाच हजार नागरिक महापुराच्या विळख्यात अडकले. त्यापैकी ३ हजार ३०० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर १ हजार ७०० लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या मदतीसाठी सैन्य दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
रात्री सैन्य दलाची एक तुकडी ब्रह्मपुरी येथे पोहोली आहे. या तुकडीकडून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. सैन्य दलाच्या ३० जवानांच्या मदतीने बचाव कार्य पुढे नेणार असल्याची माहिती देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त गावांचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हवाई दौरा करून परिस्थिती चा आढावा घेतला, या वेळी गावच्या गावं पुराच्या पाण्याने वेढल्याचे आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून आले. अपेक्षे पेक्षा परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसेखुर्द धरणाच्या पाणी विसर्गाने महापुराची स्थिती निर्माण केली आहे . वैनगंगा नदीकाठच्या शेकडो गावांना पुराने वेढले आहे. यातील पंधरा गावे अतिबाधित आहेत या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून दुमजली घरे देखील बुडाली आहेत. या सर्व गावांमध्ये वायुदलाच्या हेलिकॉप्टर द्वारे खाद्य पाकिटे व पाणी पोहोचविले गेले.
गेले तीन दिवस हा भाग पूरग्रस्त आहे. राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या भागाची हवाई पाहणी केली तेव्हा परिस्थिती अपेक्षेपेक्षाही बिकट असल्याचे पुढे आले आहे. आगामी काळात विसर्ग कमी होणार असला तरी नागरिकांची पुराच्या वेळी त्यातून सुटका करण्यासाठी अधिक ठोस प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
पूरग्रस्त भालेश्वर या गावासाठी मदत करण्यात येत आहे. वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरद्वारे फूड पॉकेट्स आणि पाणी देण्यात येत आहे. एअर ड्रॉप, ब्रम्हपुरीच्या NH ग्राउंड वरून मदत सामुग्री घेवून वायुसेनेचे हेलिकॉप्टर येथे दाखल झाले आहे. चंद्रपुर ब्रम्हपुरी इथल्या निवजा बाई हितकारणी महाविद्यालयाच्या पटांगण आवरून हेलिकॉप्टर मदत सामुग्री घेऊन पूरग्रस्त गावांमध्ये ड्रॉप करणार आहे यात खाण्याच्या वस्तू आणि पाणी यांचा समावेश असणार आहे पिंपळगाव चिखलगाव बेलगाव यासह विविध गावांमध्ये अडकलेल्या सुमारे २५ हजार पूरग्रस्त नागरिकांना ही पाकिटे टाकली जाणार आहे आगामी काळातही मागणीनुसार अशा पद्धतीने मदत पोहोचवली जाणार आहे यासाठी वायुदल जिल्हा प्रशासनाला मदत करत आहे.