दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि लांबलेला पाऊस लक्षात घेता चारा छावण्या सुरू ठेवण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. दुष्काळाचा आढावा आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर बोलताना राज्यातील दुष्काळ स्थिती पाहता आणि लांबलेला पाऊस लक्षात घेता चारा छावण्या चांगला पाऊस पडेपर्यंत चालू ठेवा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती. 


पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील दुष्काळ स्थितीची सद्यस्थिती विधानसभेत मांडली. त्याचबरोबर चारा छावण्या ३१ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती दिली. याशिवाय, पाण्याचे टॅंकर किती दिवस सुरू ठेवायचे याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी विधानसभेत दिली.