तळलेल्या तेलाचा वापर कराल तर सावधान!
.तेलाचा तिसऱ्यांदा पुर्नवापर केल्यास कारवाईला सामोरे जावं लागणार आहे. FDA ने दिलेल्या या इशाऱ्यानंतर अनेक हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहे
प्रशांत अंकूशराव, झी 24 तास मुंबई: अनेकदा फेरीवाले, हॉटेलवाले, रेस्टॉरंटवाले एकादा वापरलेलं तेल तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा देखील वापरतात. अशा स्वरुपाचा तेलाचा वापर हा अरोग्यासाठी हानीकारक असतो. तेलाचा तिसऱ्यांदा पुर्नवापर करणं गुन्हा असला तरी तो सर्रासपणे अनेकदा अनेक ठिकाणी केला जातो. मात्र आता अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कंबर कसली आहे. कायदा मोडणाऱ्यांना दणका देण्याच्या तयारी अन्न आणि औषध प्रशासन आहे. तसा इशाराच FDA ने दिला आहे. तेलाचा तिसऱ्यांदा पुर्नवापर केल्यास कारवाईला सामोरे जावं लागणार आहे.FDA ने दिलेल्या या इशाऱ्यानंतर अनेक हॉटेल्स चालकांचे धाबे दणाणले आहे. अन्नपदार्थ तळण्यासाठी तेलाचा जास्तीत जास्त फक्त दोन वेळा वापर करुन संपवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
काय होणार कारवाई
खाद्य पदार्थात होणारी भेसळ, तसंच खाद्यपदार्थाचा दर्जा यासगळ्यांवर FDA ची करडी नजर असते. त्यात आता अन्न आणि औषध प्रशासनाने आपला मोर्चा खाद्य पदार्थात वापरणाऱ्या तेलाकडे वळवला आहे. खाद्यतेलाचा तिसऱ्यांदा वापर करता येणार नसल्याचं सांगण्यात आलंय. जर खाद्यतेलाचा तिसऱ्यांदा पुर्नवापर केला तर अन्न सुरक्षा कायदा 2006, नियम आणि नियमन 2011 अन्वये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
जे व्यावसायिक दररोज 50 लिटर पेक्षा जास्त तेलाचा वापर करतात त्यांनी तेलाची नोंद ठेवणं बंधनकारक आहे. तसंच पुर्नवापर करण्यात आलेलं आणि साठवून ठेवलेलं खाद्यतेल केंद्रिय अन्न सुरक्षा आणि मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मान्यताप्राप्त बायोडिझेल कंपनीला देणं बंधनकारक असणार आहे.
तेलाच्या पुर्नवापराचे धोके
खाद्यतेल दोनवेळाचं वापरण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तेल जर तिसऱ्यांदा वापरण्यात आलं तर त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होत असल्याचं सांगितलं जातं आहे. तिसऱ्यांदा तेल वापरल्यास तेलातील पोलर कंपाऊंड आणि ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढतं. यामुळे कर्करोग, हृदयरोग, पचनासंदर्भातील रोग होण्याचा संभव असतो