पुणे : शहरात विक्री करण्यात येणाऱ्या बाटली बंद पाण्यात चक्क शेवाळ सापडले. तसेच काही बाटल्यांत हिरवे पाणी आढळून आले. पैसे देवूनही असे पाणी मिळत असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच बाटली बंद पाण्यात शेवाळ आणि हिरवे पाणी आढळल्याचे वृत्त 'झी २४ तास'ने दाखवले. या संदर्भातील बातमी सोमवारी प्रसारित केली होती. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या अन्न व औषध प्रशासनाने संबंधित कंपनीवर आज छापा टाकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गगनगिरी फूडस्, असे या कंपनीचे नाव आहे. 'श्रीपाद ऑक्सीमिस्ट ॲक्वा ' या नावानं ही कंपनी बाटली बंद पाण्याची निर्मिती करते. पिंपरी - चिंचवड  येथील चिखलीत या हे उत्पादन केले जाते. त्याच ठिकाणी आज अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला आहे. एफडीएच्या कारवाईत या प्लांटची सखोल तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली. 


या कंपनीच्या बाटलीबंद पाण्यात शेवाळ सापडल्याने कंपनीवर कडक कारवाई केली जाईल. उत्पादन थांबवण्याबरोबरच दंडात्मक देखील कारवाई होईल, असं एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या दूषित पाण्याविरोधात आरटीआई कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एफडीएकडे रितसर तक्रार केली आहे. दूषित पाण्याची बाटली आणि तक्रार अर्ज त्यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांकडे दिला आहे, अशी माहिती एफडीएचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली.