राज्यपालांकडे त्याने स्वतःसाठी नाही पण `या` कारणासाठी मागितले `इच्छा` मरण
स्वतःवर अन्याय होत असेल, कर्जबाजारी असेल तर आत्महत्या करणारे अनेक जण आहेत. पण, त्याने गोरगरीब. शेतकरी यांच्यासाठी स्वेच्छा मरण मागितलं..
नाशिक : शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुलतानी संकट येऊन त्यांचं नुकसान होतं. पीक विमा कंपन्याकडून अन्याय होतो. शहरी भागापेक्षा सर्वात जास्त भरडला जातो तो शेतकरी. याच गोरगरीब शेतकऱ्यांसाठी एका सामाजिक कार्यकत्याने राज्यपालांकडे इच्छा मरण मागितले आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील परसुल येथील राजेंद्र खांगळ ऊर्फ आर. के. मामा या सामाजिक कार्यकर्त्याने गोरगरीब शेतकरी यांच्यासाठी मागण्या केल्या आहेत. मात्र, या मागण्यांची दखल प्रशासन घेत नसल्यामुळे त्यांनी थेट राज्यपालांकडे इच्छा मरण मागितले आहे.
गोरगरिब शेतकऱ्यांना परिपूर्ण रेशन मिळावे, रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्या, नाशिक जिल्ह्या बँकेत अडकलेल्या शेतकऱ्यांच्या ठेवी मिळाव्यात अशा विविध मागण्या आर. के. मामा यांनी केल्या आहेत. मात्र, अनेक आंदोलने तसेच निवेदन देऊनही प्रसाधन दखल घेत नसल्याने त्यांनी आज आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना अडवून ताब्यात घेतले. यावेळी आर. के. मामा यांनी इच्छा मरणाची मागणी केली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सामाजिक कार्यकर्त्यांला हे टोकाचं पाऊल उचलावे लागले याचा गावकऱ्यांनी निषेध केला.