Manohar Joshi Death: महाराष्ट्राचे पहिले बिगरकाँग्रेस मुख्यमंत्री अशी ओळख असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारांसाठी हिंदूजा रूग्णालयात दाखल केले होतं. रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यंतरी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोहर जोशींची भेट घेतल्यानंतर ते चर्चेत आले होते. सध्या सुरु असलेल्या शिंदे विरुद्ध ठाकरे वादासंदर्भात जोशी तटस्थ असल्याचं दिसून आलं. मात्र यापूर्वी त्यांनी अनेकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली होती. मनोहर जोशी यांनी शिवसेना-भाजपा युती तुटल्यानंतर पुण्यातील एका कार्यक्रमात यासंदर्भातील उल्लेख आवर्जून केला होता.


ठाकरे बंधू एकत्र आले तर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोहर जोशी यांनी पुण्यातील एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमापूर्वी माध्यमांशी संवाद साधला होता. युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मनोहर जोशी यांनी, "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रात इतिहास घडेल. त्यांनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून पुरेसे होणार नाही, तर त्या दोघांचीही इच्छा असणे आवश्यक आहे" असं म्हटलं होतं.


मध्यस्थी करणार नाही


राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं असं वाटत असलं तरी आपण मध्यस्थी करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. "दोघांनी एकत्र यावे अशी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल. मात्र, त्यासाठी त्या दोघांची इच्छा असणे महत्त्वाचे आहे. मी याबाबत मध्यस्थी करणार नाही,’ असं ते यावेळेस म्हणालेले. 


नक्की वाचा >> पवार-ठाकरे मैत्रीमुळे मनोहर जोशी झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; 'त्या' सल्ल्यानं नशीब पालटलं


युती तुटल्याने नुकसान


शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यानंतरच्या या संवादामध्ये मनोहर जोशींनी युती तुटल्याने नुकसान होणार असं म्हटलं होतं. "एकच ध्येयने काम करत असलेले पक्ष वेगळे होतात तेव्हा नुकसान होते. सर्वाधिक यश आपल्यालाच मिळावे यासाठी आता हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे राहतील. मात्र युती तुटल्याने शिवसेनेचे नुकसान होणार नाही," असं मनोहर जोशी म्हणाले होते. युतीत पंचवीस वर्षे सडली या उद्धव ठाकरेंच्या मताशी मी सहमत आहे, असेही जोशी यांनी यावेळेस सांगितले होते.