मुंबई : कोरोनाने संपूर्ण देशभरात थैमान मांडल आहे. महाराष्ट्रातही जिल्हाबंदी करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात कुणालाही प्रवास करण्यास परवानगी नाही. अशातच माजी मंत्र्यांनी चक्क मुंबई ते बीड असा प्रवास करून जिल्हाबंदीचे सर्व नियम धाब्यावर मांडले आहेत. मुंबईतील कोळीवाडा जो कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. तिथे राहणाऱ्या माजी मंत्र्यांनी हा प्रवास केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी खासगी वाहनाने कोळीवाडा, मुंबईहून बीडपर्यंत प्रवास केला आहे. आता त्यांच्या कुटुंबियासह चालकाला देखील होम क्वारंटाइन राहण्याची मागणी करण्यात आली आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या बीडच्या बंगल्यात विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर कुटुंबीयासह राहतात. अशातच माजी मंत्री गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. 


तसेच जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाबंदीचे आदेश मोडल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांच्या समर्थक नगरसेवकांनी केली आहे. एवढंच नव्हे तर या संदर्भातील तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अगदी सुरूवातीपासूनच बीडमध्ये कडक भूमिका घेतली जात आहे. अशातच शुक्रवारी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर जिल्हाबंदी तोडल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असताना आता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देखील आदेश मोडले आहे. 


जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील वाद संपूर्ण जगाला माहितच आहेत. काका-पुतण्यांमधील वाद संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयदत्त क्षीरसागर बीडला आल्यामुळे होम क्वारंटाइन राहण्याची मागणी केली जात आहे.