सांगली : माजी आमदार मधुकर कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. १९९५ मध्ये जत विधानसभा मतदारसंघातून मधुकर कांबळे हे अपक्ष उमेवारीवर आमदार म्हणून निवडून आले होते. वयाच्या २९ व्या वर्षी ते आमदार झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुकर कांबळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलग दोन वेळा आमदार असणाऱ्या उमाजी सनंमडीकर यांचा मधुकर कांबळे यांनी आश्चर्यकारकरित्या पराभव केला होता. काँग्रेस मधील तत्कालीन नाराज नेते एकत्र येऊन उमाजी सनंमडीकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. श्रीमंत डफळेसरकार, विलासराव जगताप, सुरेश शिंदे यांनी मधुकर कांबळे यांची उमेदवारी जाहीर केली. अपक्ष लढणाऱ्या मधुकर कांबळे यांनी उमाजी सनंमडीकर यांचा पराभव केला होता.



अपक्ष आमदार झाल्यानंतर  त्यांनी तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारला पाठिंबा दिला होतो. १९९५ ते १९९९ या कालावधीत ते जतचे आमदार होते. त्यांच्या आमदारकीच्या काळातच म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या कामाची सुरुवात झाली होती. त्यावेळी सांगली जिल्ह्यात पाच अपक्ष आमदार निवडून आले होते, या सर्वांनी युती सरकारला पाठिंबा दिला होता. 


युतीच्या सरकारने ताकारी - म्हैसाळ जल सिंचन योजना सुरू करून दुष्काळी जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भाग, आटपाडी, खानापूर, तासगवपूर्व भागाला पाणी द्यावे अशी आग्रही मागणी त्यावेळच्या अपक्ष आमदारांनी केली, त्यात माजी आमदार मधुकर कांबळे यांची भूमिकाही महत्वाची होती. शिवसेना-भाजपा युतीसरकारच्या काळातच ताकारी आणि म्हैसाळ जलसिंचय योजनेची सुरुवात ही झाली होती.