Dipali Sayyad : राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचला; दिपाली सय्यद यांच्यावर खळबळजनक आरोप
उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांची भेट घेऊन दिपाली यांनी राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचला होता असा खळबळजनक दावाही शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : अभिनेत्री दिपाली सय्यद(Dipali Sayyad ) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS chief Raj Thackeray) यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा खळबळजन आरोप करण्यात आला आहे. दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी हा आरोप केला आहे. दिपाली सय्यद यांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत कनेक्शन असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दिपाली सय्यद यांनी देखील या आरोपांवर प्रितिक्रिया दिली आहे.
दिपाली सय्यद यांचे डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. दाऊद कडून दीपाली यांना मोठी आर्थिक रक्कम मिळत असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांची भेट घेऊन दिपाली यांनी राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचला होता असा खळबळजनक दावाही शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
दिपाली सय्यद यांना दाऊद त्याच्या भावामार्फत पैसे पूरवतो. दिपालीताई चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून कोविड काळात मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यात आले. ते सर्व पैसे दाऊद इब्राहिम यांच्याकडून मिळत असल्याचे भाऊसाहेब यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
दिपाली सय्यद आणि दाऊदच्या संबंधित असलेल्या अंडरवर्ल्डच्या लोकांचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. मात्र, आपल्या जीविताला धोका असल्यामुळे सरकारकडून आपल्याला संरक्षण मिळावे अशी मागणी देखील भाऊसाहेब यांनी केली आहे.
दिपाली सय्यद यांनी राजभवनात राज्यपालांच्या हस्ते अनेकांना कोरोना योद्धा पुरस्कार दिले. मात्र, पुरस्कारात देण्यात आलेली रक्कम कोणालाच दिली नाही. या सर्व गोष्टी राज्यपालांना देखील माहित असताना त्यांनी सहकार्य केल्याचा आरोप भाऊसाहेब यांनी केला आहे.
कोण आहेत दिपाली सय्यद?
दिपाली भोसले सय्यद या अभिनेत्री आणि राजाकरणी आहेत. 1 एप्रिल 1978 साली बिहारमध्ये त्यांचा जन्म झाला. बिहारच्या सीव्हीआर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. दिपाली यांना लहानपणापासून नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. इंजिनीअरंगिची डिग्री मिळवल्यानंतर त्यांनी आपली वेगळी वाट निवडली. 2006 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. बंदिनी, समांतर या मालिकांमधून दिपाली सय्यद यांना अभिनय क्षेत्रात ब्रेक मिळाला. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिका, जाहिराती तसंच सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली. दिपाली सय्यद या उत्तम नृत्यांगना आहेत. त्यामुळे अनेक डान्स रियालिटी शोमध्ये त्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसल्या. 'जत्रा' सिनेमातील दिपाली सय्यद यांचं "ये गो ये, ये मैना पिंजरा बनाया सोने का" या गण्यामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
2008 साली दीपाली भोसले सय्यद यांनी दिग्दर्शक बॉबी खान उर्फ जहांगीर सय्यद यांच्याशी लग्न केलं. यानंतर त्यांनी राजकारणात एंन्ट्री घेतली. 2014 ला अहमदनगरमधून आम आदमी पक्षातून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागले. यानंतर त्यांनी शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला. 3 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले. दिपाली सय्यद आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.