स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईतल्या खारघरमधल्या सरस्वती इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फार्म्यूला वन कार तयार केली आहे. या महाविद्यालयातल्या ३२ विद्यार्थ्यांनी मिळून या कारची निर्मिती केली आहे, या कारला वायू असं नाव देण्यात आलं आहे.
 
खारघरमधल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही कार, संपूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. या कारला निंजाचं इंजिन लावण्यात आलंय. या कारचं एकूण वजन २१० किलो असून, त्यावर अजून मेहनत घेऊन या इंजिनचं वजन १७० किलोपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत. रशियामध्ये होणाऱ्या एक्सपोमध्ये सुद्धा ही कार भारताचं नेतृत्व करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वायू नावाची ही कार बनवताना विद्यार्थ्यांना अनेक कठिण प्रसंगांचा सामना करावा लागला. मात्र महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्रायोजक, विद्यार्थ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. 


या आधीही या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची कार बनवली होती. त्या कारनं अनेक पारितोषिकंही पटकावली होती. आता नवी वायू ही कारही पारितोषिकं मिळवेल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.