Chandrapur News : सेल्फीचा नाद चार मित्रांच्या जीवावर बेतला आहे. चंद्रपुर येथे अशीच एक धक्कादायक घटना घजली आहे. सेल्फी काढण्याच्या नादात चार मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाचवेळी चौघा मित्रांना जलसमाधी मिळाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या चारही तरुणांचे मृतदेह तलाबाहेर काढण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या घोडाझरी सिंचन तलाव परिसरात ही घटना घडली आहे. मनीष श्रीरामे (वय 26 वर्षे), धीरज झाडें (वय 27 वर्षे), संकेत मोडक (वय 25 वर्षे) आणि चेतन मांदाडे ( वय 17 वर्षे ) अशी मृत तरुणांची नावे आहेत. 


नेमकं काय घडलं?


वरोरा तालुक्यातील शेगाव येथील 8 युवक वर्षा सहलीसाठी येथे आले होते. यातील एक युवक तलाव परिसरात सेल्फी काढत होता. सेल्फी काढण्याच्या नादात तो तलावात घसरला. मित्राला तलावात पडल्याचे पाहून या तिघा मित्रांनी देखील तलावात उडी घेतली.  मित्राला वाचविण्याच्या नादात पाण्यात उतरलेल्या अन्य 3 युवकांना देखील जलसमाधी मिळाली. दरम्यान स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.  स्थानिक मासेमारांच्या मदतीने शोधकार्य राबवण्यात आले. यानंतर या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 


मुंबईतील मालाड-मार्वेच्या समुद्रात 5 तरुण बुडाले


मुंबईतील मालाड-मार्वेच्या समुद्रात 5 तरुण बुडाले आहेत. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलंय तर तिघे बेपत्ता आहेत. ही मुलं मार्वे किना-यावर फिरण्यासाठी आले होते. समुद्रात अंघोळ करताना ते लाटेसोबत खोल समुद्रात फेकले गेले. यातील कृष्णा हरिजन आणि अंकुश शिवारे या दोघांना स्थानिकांनी वाचवलं तर इतर तिघे बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस, कोस्टगार्ड आणि नेव्हीचं पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.


सेल्फी काढताना काळजी घ्या


सध्या मान्सून सुरु झाल्यामुळे वर्षा सहलींचे आयोजन केले जाते. समुद्र किनारे, तलाव तसेच धबधब्यांवर पर्टकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, असा ठिकाणी सेल्फी घेताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.