एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल; आडोशाला थांबलेल्या आई वडिलांचा दोन लहान लेकींसह मृत्यू
राजगडे कुटुंब एका लग्न सोहळ्यातून परत येत होते. तुळशी फाट्याजवळ या चौघांचे मृतदेह आढळले आहेत. नागरिकांनी पोलिसांना पाचारण करत मृतदेह रुग्णालयात हलविले.
आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : सध्या राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच हा पाऊस अनेक ठिकाणी जीवघेणा ठरताना दिसत आहे. गडचिरोलीत (Gadchiroli) याच पावसामुळे एक संपूर्ण कुंटूंब उद्धवस्त झाले आहे. आडोशाला थांबलेल्या आई वडिलांचा दोन लहान लेकींसह मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. वडसा देसाईगंज शहराजवळ पावसा दरम्यान आडोशासाठी झाडाखाली उभ्या असलेल्या कुटुंबावर वीज पडली. यात पती-पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला आहे. तुळशी फाट्याजवळ हे चारही मृतदेह आढळले आहेत.
नागरिकांनी पोलिसांना पाचारण करत मृतदेह रुग्णालयात हलविले. वडसा तालुक्यातील आमगावच्या भारत राजगडे त्यांची पत्नी आणि दोन मुलींचा मृतांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात गेले चार दिवस सातत्याने पाऊस पडत आहे. अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट होत आहे. अशातच एकाच वेळी चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजगडे कुटुंब एका लग्न सोहळ्यातून परत येत होते. तुळशी फाट्याजवळ या चौघांचे मृतदेह आढळले आहेत. नागरिकांनी पोलिसांना पाचारण करत मृतदेह रुग्णालयात हलविले. वडसा तालुक्यातील आमगावच्या भारत राजगडे, पत्नी अंकिता व दोन मुलीं देवांशी आणि चिऊ यांचा मृतांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात गेले चार दिवस सातत्याने अवकाळी पाऊस व विजांचा कडकडाट सुरू आहे. अशातच एकाच वेळी चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
राज्यात पुढील 5 दिवस पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर विदर्भातल्या नागपूर, गोंदिया, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 5 दिवस विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये 26 एप्रिलपर्यंत पाऊस होऊ शकतो.