विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : ऑनलाइन परीक्षेचा पेपर फोडणा-या चौघांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महावितरणमध्ये लिपिक भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा पेपर फोडणा-या चौघांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. 


हायटेक मोबाइल तंत्रज्ञानानं ज्वारीच्या दाण्याएवढ्या इअरफोनच्या माध्यमातून परीक्षार्थींना प्रश्नांची उत्तरे या टोळीतील आरोपी पुरवत होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा घालून हा प्रकार पोलिसांनी उघड केलाय.


परीक्षेत कॉपी करण्याचे अनेक धक्कादायक तंत्र आपण आजपर्यंत पाहिलेत... बहुतेक वेळा ते उघडही झालेत. मात्र औरंगाबाद पोलिसांनी उघड केलेलं एक रॅकेट आणि त्याचं तंत्र पाहून अवाक् होण्याची वेळ आलीय. 


रविवारी महावितरणची लिपिक पदाची ऑनलाईन परीक्षा राज्यभरात सुरू होती. याच परीक्षेतल्या एका परीक्षार्थीला औरंगाबादेतून प्रश्नांची उत्तरं सांगण्यात येत होती. त्यासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञानही थक्क करणारं होतं. ज्वारीच्या दाण्याएवढा एअरफोन परीक्षा देणा-याच्या कानात होता आणि त्याला कनेक्ट करणारं ब्लू टूथ डिव्हाईस परीक्षार्थीच्या पाठीवर लावलं होतं. त्यातून परीक्षा देणारा पुटपुटला तरी त्याचा आवाज उत्तर सांगणा-या टोळीला जात होता...त्यानंतर तत्काळ उत्तरं सांगितली जात होती. 


यातला मुख्य आरोपी अर्जुन घुसिंगे हा प्रत्येक परीक्षार्थीकडून किमान 8 लाखांत पास करण्याचा सौदा करत होता. परीक्षेपूर्वी काही अॅडव्हान्स घेतल्यावर हा सुक्ष्म इअरफोन दिल्या जात असे. परीक्षार्थीची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावरून  मिळवल्या जात असे आणि त्यानंतर परीक्षा देणा-यासोबत संधान साधलं जायचं. प्रश्नपत्रिका कशी सोडवायची याचं प्रात्यक्षिक सुद्धा दिलं जायचं.  


मुख्य आरोपी अर्जुन घुसिंगे याआधीही अशाच प्रकरणात आरोपी असल्याची माहिती आहे. तो फरार असल्यानं पोलीस त्याच्या मागावर आहेत तर उत्तरं पुरवणा-या ४ आरोपींना पोलिसांनी अटक करून लॅपटॉप, ६ फोन, काही पुस्तकं पोलिसांनी जप्त केलीयत. तर नक्की कोण कोण या पद्धतीनं उत्तरं ऐकत होते याचाही शोध सुरुय. या हायटोक टोळीनं याआधी अनेकांना असं पास करून दिल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. पोलिसांच्या तपासानंतरच आता हा सगळा प्रकार उघड होवू शकतो...