विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आता आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. अगदी घरबसल्या लर्निंग लायसन्स मिळवण्याची ऑनलाईन सोय सरकारनं केलीय. मात्र ते मिळवताना तुमची फसवणूक देखील होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गुगलवर ड्रायव्हिंग लायसन्स इन महाराष्ट्र' असा शब्द टाकल्यावर अशा भरमसाठ वेबसाईट्स उघडतात. त्यामुळे ऑनलाईन लर्निंग लायसन्ससाठी नेमकं कुठल्या साईटवर जावं, असा प्रश्न पडतो. आरटीओची खरी वेबसाईट दिसतेच, मात्र अनेक बोगस वेबसाईटच्या लिंक देखील दिसतात.



काही नकली वेबसाईटवर तुमचं नाव आणि फोन नंबर टाकला की थेट पैशांचीच मागणी होते. तुम्हाला कसलं लायसन्स हवंय, कुठं राहता वगैरे माहिती अजिबात मागितली जात नाही. अशा बोगस वेबसाईट्समुळं अनेकांची लूट झालीय. मात्र किरकोळ रकमेची फसवणूक असल्यानं फारसं कुणी पोलीस स्टेशनची पायरी चढत नाही. 


पण, या माध्यमातून अनेकांची फसवणूच झाल्याची भिती आहे, काही लोक पोलिसांकडे गेलेत तर काही आरटीओ अधिकाऱ्यांकडे. मात्र पैसै जास्त नसल्यानं गुन्हा कुणी दाखल केला नाही, मात्र यातून मनस्ताप होतोय, पैसैही जातात आणि परवानाही मिळत नाही आणि पुर्ण प्रक्रीया नव्यानं करावी लागतेय.


लोकांची फसवणूक होत असल्याचं परिवहन अधिकारी सुद्धा मान्य करतात. त्यांनी डेमो करून पाहिला तेव्हा त्यांना देखील फसवणुकीचा अनुभव आला.  त्यामुळे PARIVAHAN.GOV.IN या अधिकृत वेबसाईटवरूनच परवाना घ्यावा, असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.


सध्याच्या जमान्यात ऑनलाईनमुळे अनेक गोष्टी सुलभ झाल्या आहेत. त्याचवेळी फसवणुकीचा धोका देखील वाढलाय.. तुमचा खिसा तर खाली होईलच, शिवाय तुमची खासगी माहिती सायबर भामट्यांच्या हातात जाण्याचीही भीती आहेच. तेव्हा, काळजी घ्या.