मिलिंद आंडे, झी २४ तास, वर्धा : शेतकरी कर्जमाफीत मोठा घोळ असल्याचं समोर आलंय. लाभार्थ्यांच्या यादीत अनेक मृत शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. शिवाय आधारकार्डमुळेही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं कठीण झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावणार नाही असं सांगत ठाकरे सरकारनं कर्जमुक्ती योजना जाहीर केली. २२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. पण या कर्जमाफी योजनेत मोठा घोळ समोर आलाय. कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत मृत शेतकऱ्यांचाही समावेश आहे. 


वर्ध्यातल्या कवडू सपाट यांचा मृत्यू झाल्यानंतरही लाभार्थ्यांच्या यादीत त्यांचं नाव आलं. पण प्रमाणिकरणाची अडचण आली. त्यामुळं कर्जमाफीसाठी पात्र असतानाही सपाट कुटुंबीयांना कर्जमाफी मिळणार नाही.



भगवान पिपळकार, सुलोचना धारपुरे आणि नत्थु पाटील हे मृत शेतकरी लाभार्थ्यांच्या यादीत आहे. हे एकट्या वर्धा जिल्ह्यातलं चित्रं आहे. राज्यात हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. 


अनेक शेतकऱ्यांच्या बँकेतील आधार क्रमांक आणि प्रत्यक्षातला आधार क्रमांक वेगळा आहे. त्यामुळं कर्जमाफीसाठी पात्र असूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाहीयत.


कर्जमाफी योजनेत अनेक त्रुटी आहेत. त्या आताच दूर करणं गरजेचं आहे. अन्यथा यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेसारखीच ही कर्जमुक्ती योजनाही टीकेची धनी होईल.