मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारकडून 18 ते  45 वर्षे वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस विनामूल्य दिली जाईल. हा खर्च सरकार आपल्या तिजोरीतून करणार आहे असे वक्तव्य राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे. तसेच लसीची कमतरता भासू नये यासाठी राज्य सरकार जागतिक टेन्डंर मागवून अधिकाधिक लस खरेदी करणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 मे पासून, केंद्र सरकारने देशभरात 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. नवाब मलिक म्हणाले की, "कोविशिल्ड लस केंद्राला 150 रुपये, राज्यांना 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 600 रुपयात मिळणार आहे. कोव्हॅक्सिनची किंमत राज्य सरकारसाठी 600 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 1200 रुपये जाहीर केली गेली आहे."


नवाब मलिक म्हणाले की, "मंत्रिमंडळाच्या बैठकीत लसींच्या दराबाबत चर्चा झाली. या संदर्भात एकमत झाले की, ही लस राज्यातील लोकांना विनाशुल्क दिली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर संमती दिली होती. याबाबत शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चर्चा केली आहे. दरम्यान, या लसीची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी लवकरच जागतिक टेन्डंर प्रसिद्ध केला जाईल."


अजित पवार यांनी मोफत लसीकरणाबद्दल काय म्हटले?


1 मे हा जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो, परंतु महाराष्ट्रात हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून देखील साजरा केला जातो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील ऑक्सिजनसह लसींचा आणि इतर वैद्यकीय वस्तूंच्या साठ्यांबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "1 मे ला महाराष्ट्र दिवसा निम्मीताने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे." याशिवाय, राज्यात लसींची कमतरता भासू नये यासाठी अजित दादांनी लस उपलब्ध करुन देण्यासाठी जागतिक टेन्डंर काढण्या विषयी वक्तव्य केले आहे.


1 मे रोजी मुख्यमंत्र्यांचे भाषण


मुख्यमंत्री विनामुल्य लस देण्याबाबत राज्य सरकारच्या भूमिकेविषयी अंतिम घोषणा 1 मे रोजी करतील. कोविशिल्ड लस उत्पादक सीरम संस्थेचे मालक अदार पूनावाला म्हणतात की, त्यांना इतक्या लसी पुरविणे शक्य नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जितकी क्षमता असेल, तितक्या लस ते उप्लब्ध करून देतील. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी जागतिक टेन्डंरबद्दल बोलताना सांगितले की, या टेन्डंरद्वारे ते रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लस उपलब्ध करून शकतील.


ते म्हणाले की, "सीरम असो, भारत बायोटेक असो वा फायझर, जिथे आम्हाला जे उपलब्ध असेल, ते घेऊन आम्ही १ मे पर्यंत लसीकरणाची तयारी पूर्ण करु. मुख्यमंत्र्यांनीही यावर संमती दिली आहे."


दरम्यान, बंद ऑक्सिजन प्लांट देखील सुरू केले जात आहेत. यातील काही प्लांट वीज अभावी बंद झाले आहेत, तर काही कंपन्या आर्थिक कारणांमुळे बंद झाल्या आहेत. ते सर्व सुरू केले जात आहेत असे ही त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या आवाहनावर साखर कारखान्यांमध्येही ऑक्सिजन तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


गुजरातचा जामनगर येथून महाराष्ट्राचा कोटा निश्चित करण्यात आला आहे, जरी तो वाढवला नाही तरी तो कमी तरी केला जाऊ नये, अशी विनंती केंद्राला करण्यात आली आहे. अशा प्रकारे अजितदादांनी संपूर्ण तयारीचा तपशील दिला आहे.